Monday, May 26, 2008

"व्हिजनलेस पॉलिटिक्‍स'चा फटका


वर्षभरानंतर येऊ घातलेल्या सर्वसाधारण निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटक विधानसभेच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते. आज सकाळपासून निकालाचे आकडे जाहीर होऊ लागले आणि आधीच महागाईच्या प्रश्‍नामुळे अडचणीत आलेल्या कॉंग्रेस सरकारच्या पायाखालची वाळूच सरकली. कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी तीन टप्प्यांत मतदान घेण्यात आले. विधानसभा ताब्यात घेण्यासाठी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीतच आघाडी घेणे आवश्‍यक होते. कारण- पहिल्या टप्प्यातच राज्यातील 40 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नागरिक मतदान करणार होते. त्यामुळे भाजप, कॉंग्रेस, जनता दल (धर्मनिरपेक्ष) आदी सर्वच महत्त्वाच्या पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. राज्यातील प्रमुख नेत्यांसमवेतच केंद्रीय पातळीवर पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय नेत्यांनीही कर्नाटक विधानसभा काबीज करण्यासाठी चांगलेच प्रयत्न केले. पंतप्रधान पदाचे दावेदार समजले जाणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, कॉंग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहनसिंग, भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग, युवा नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक चित्रपट कलावंतांनीही या निवडणुकीच्या प्रचारात सहभाग घेतला होता. कॉंगेस नेते एस. एम. कृष्णा यांनी तर या निवडणुकीसाठी राज्यपाल पदाचाही त्याग केला; मात्र पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याच्या कृष्णा यांच्या स्वप्नावर मतदारांनी पाणी फेरले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला पहिल्यांदाच एवढे बहुमत मिळाले आहे. या निकालामुळे भाजप दक्षिण भारतात सत्तास्थापनेचे स्वप्न पूर्ण करू शकणार आहे; तर कॉंग्रेसने आपल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे. कधी काळी जनता दलाचे राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्नाटकमध्ये मतदारांनी या वेळी मात्र जनता दलाला घरचा रस्ता दाखविला आहे. या निवडणुकीत अस्तित्व टिकविण्यासाठी जनता दलाने खूपच मेहनत घेतली होती. जनता दलाचे ज्येष्ठ नेते, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी स्वतः निवडणुकीच्या प्रचारात भाग घेतला. जनता दलातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिद्धरामया यांनी जनता दलाचा हात सोडून कॉंग्रेसला जवळ केल्याने जनता दलाला मोठा फटका बसला आहे. सिद्धरामया हे राज्यातील ओबीसींचे नेते आहेत. त्यामुळे या निवडणुकीत राज्यातील ओबीसींची मते मोठ्या प्रमाणात कॉंग्रेसला मिळण्याची शक्‍यता जाणकारांनी व्यक्‍त केली होती. सिद्धरामया यांना धडा शिकविण्यासाठी देवेगौडा यांनी तर मोहीमच उघडली होती; परंतु याआधीही चार वेळा निवडून आलेले सिद्धरामया मतदारसंघ बदलूनही पुन्हा निवडून आले आहेत. बेंगळूरुपासून अगदीच जवळ असलेल्या रामनगर मतदारसंघातून कुणीही आमदार पुन्हा निवडून येत नाही, असा इतिहास आहे; मात्र माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी येथून पुन्हा निवडून येऊन नवा इतिहास रचला आहे. असे असले तरीही कुमारस्वामी यांची पुन्हा एकवार मुख्यमंत्री होण्याची इच्छा मात्र तशीच राहिली आहे. काही महिन्यांपूर्वीच बायपास सर्जरी झालेली असतानाही केवळ मुख्यमंत्री होण्याच्या आशेवरच कुमारस्वामी यांनी रामनगर विधानसभा मतदारसंघाचा संपूर्ण परिसर पिंजून काढला होता. पहिल्यांदाच कर्नाटकमध्ये भाजप स्वबळावर सरकार स्थापणार आहे. येडीयुरप्पा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. भाजपला मिळालेला हा विजय अनपेक्षित नसला तरीही आपल्याला एवढ्या कमी जागा मिळतील याची कदाचित कॉंग्रेसला कल्पनाही नसावी. म्हणूनच हा विजय कॉंग्रेसच्या जिव्हारी लागणारा आहे. अणुकराराच्या मुद्द्यावरून अडचणीत आलेले कॉंग्रेस सरकार वाढती चलनवाढ आणि त्यामुळे वाढलेल्या महागाईच्या प्रश्‍नामुळे पुन्हा एकदा विरोधी पक्षांच्या टीकेचे कारण बनले. जनमानसातही वाढत्या महागाईमुळे कॉंग्रेस सरकारबद्दल असंतोष पाहायला मिळाला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने महागाईच्याच मुद्द्याचेच राजकारण केले आणि कॉंग्रेसला याचा फटका बसला. जनता दलाच्या दृष्टीने ही निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई होती; परंतु ते टिकविण्यातही जनता दलाला फारसे यश आले नाही. कर्नाटकात बंगळूरु व म्हैसूर ही दोन मोठी शहरे आणि उर्वरित कर्नाटक अशी विकासाची दरी निर्माण झाली आहे. या दोन शहरांमध्ये विकासाची गंगा वाहते; तर उर्वरित कर्नाटकात वीज, पाणी, रस्ते असे प्राथमिक प्रश्‍नही अद्याप सुटलेले नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे तर कुणीही लक्ष देत नाही. कॉंग्रेस आणि जनता दल (से.) या दोन्हीही पक्षांनी आपल्या राजवटीत या प्रश्‍नांसाठी काम केलेले नाही. त्याचाही मतदानावर परिणाम झाला, असे म्हणायला हरकत नाही. कर्नाटक विधानसभेच्या 224 विधानसभा मतदारसंघांसाठी तीन टप्प्यांत मतदान घेण्यात आले. 10 मे, 16 मे व 22 मे रोजी झालेल्या या निवडणुकीत सरासरी 64.72 टक्‍के मतदान झाले. राज्यातील 48 केंद्रांवर मतमोजणी करण्यात आली. 224 विधानसभा मतदारसंघांपैकी 111 जागा काबीज करण्यात भाजपने यश मिळविले आहे; तर कॉंग्रेसला 80 जागा मिळाल्या असून, जनता दलाला केवळ 27 जागांवर समाधान मानावे लागले. सत्तास्थापनेसाठी भाजपला फक्‍त दोन आमदारांचा पाठिंबा आवश्‍यक आहे. त्यामुळे भाजपचे दक्षिण भारतात सत्तास्थापनेचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या विधानसभा निवडणुकीत मतदान करताना राज्यातील मतदारांनी कर्नाटकमधील नेते "व्हिजनलेस' असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे याआधी कर्नाटकमध्ये सत्ता उपभोगलेल्या कॉंग्रेस आणि जनता दलाला या "व्हिजनलेस पॉलिटिक्‍स'चाच फटका बसला हे मात्र खरे.

Friday, March 14, 2008

स्पेशल एक्‍झीट झोन?

स्थापना करणाऱ्या शिवरायांच्या संपन्न रायगडावरच आता अतिक्रमण होऊ लागलंय. निजामांची गुलामी करण्याचे नाकारून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्षात खरंही करून दाखविलं. मात्र शिवरायांचा राज्यकारभार ज्या रायगडावरून चालायचा त्या रायगडातील मूळ रहिवाशांनाच आता आपल्या जमिनी सोडून बाहेर हाकलण्याचा घाट घातला जातोय. एकीकडे "स्पेशल इकॉनॉमिक झोन'च्या माध्यमातून पिकत्या जमिनी बळकावून येथील बळीराजाला हद्दपार करण्याचा डाव रचला जातोय, तर दुसरीकडे परप्रांतीयांच्या अतिक्रमणामुळे स्थानिकांच्या हक्‍काच्या रोजगारावर गदा येऊ लागली आहे. आपल्याच हक्‍काच्या जागेत, आपल्याच प्रदेशात, आपल्याच महाराष्ट्रात परप्रांतीयांनी ज्या प्रमाणात स्थानिक रोजगारावर आपली पकड निर्माण केली आहे, ते पाहून परप्रांतीय कोण असाच प्रश्‍न पडायला लागतोय. एकंदरीतच काय तर स्थानिक मराठी माणसासाठी आता हा "स्पेशल एक्‍झीट झोन' आहे की काय, असे वाटायला लागले आहे.काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविरोधात केलेल्या वक्‍तव्यामुळे देशभर दंगल उसळली. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कोंडीत सापडलेल्या राज ठाकरेंवर वाट्‌टेल तशी टीका करून तोंडसुख घेतले; तर महाराष्ट्रातील मराठी माणसाने ठाकरेंच्या या वक्‍तव्याचे, आंदोलनाचे खऱ्या अर्थाने मनापासून स्वागत केले. महाराष्ट्रात परप्रांतीयांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण होत असलेल्या समस्यांमुळे त्रासलेला सामान्य मराठी माणूस नेहमीच या विषयात आपली प्रतिक्रिया नोंदवत असतो. एवढेच की सामान्य माणसांच्या प्रतिक्रियेची तेवढी गांभीर्याने कुणी दखल घेत नाही. मुंबईच्या लोकलमधून दररोज प्रवास करणारा प्रवासीच परप्रांतीयांच्या वाढत्या लोंढ्यांमुळे होणारा त्रास काय असतो, ते सांगू शकतो. आता या सर्व प्रश्‍नांवर व्यापक विचार करण्याची वेळ आली तेव्हा घटनात्मक मुद्दा समोर आला. घटनेने सर्वांना आपल्या मर्जीप्रमाणे कोठेही राहण्याचा हक्‍क बहाल केला आहे, हेही मान्य करायला हरकत नाही. (फक्‍त राहण्याचाच हक्‍क दिलाय! तुम्हाला वाट्‌टेल तसा स्वैराचार करण्याचा नाही.) परंतु परप्रांतीयांच्या वाढत्या संख्येमुळे अपुऱ्या पडणाऱ्या सोयीसुविधा पूर्ण करण्याची जबाबदारी कुणाची? हाही प्रश्‍न वारंवार अनुत्तरितच राहतो. घटनात्मक हक्‍क असल्याचे कारण सांगून परप्रांतीयांविरोधात स्थानिकांनी पुकारलेले बंड म्हणजे राज्यघटनेचे उल्लंघन असल्याचा दावा करणारी राजकीय मंडळी या वादाचे मूळ कारण असणाऱ्या सोयीसुविधांच्या प्रश्‍नाकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. राज ठाकरे यांनी केलेले आंदोलन असो किंवा दोन दिवसांपूर्वी अलिबाग तालुक्‍यातील गोंधळपाड्यात परप्रांतीयांमुळे झालेला तणाव, या दोन्हीही घटना म्हणजे मराठी माणसाच्या भावनांचा झालेला उद्रेकच म्हणावा लागेल. आजपर्यंत अलिबागमध्ये परप्रांतीय काम करीतच होते. मात्र मुंबईत झालेल्या दंगलीनंतरही त्यांना कुणी त्रास दिला नाही. परंतु रायगडातील रोजगारावर आपलाच राज आहे, असे समजून स्थानिक कामगारांना मारहाण करेपर्यंत परप्रांतीयांची दखल गेल्यावरही मराठी माणसाने गप्प बसत गांधी नीतीचाच अवलंब करावा की काय? असो. राजकीय नेते या वादाचा काय लावायचा तो सोक्षमोक्ष लावतीलच. (त्यांच्या "व्होटबॅंक'च्या सोयीप्रमाणे.) मात्र आता खऱ्या अर्थाने मराठी माणसाने या समस्येचा खोलात जाऊन विचार करण्याची वेळ आली आहे. बौद्धिकदृष्ट्या मराठी माणसे सक्षम आहेतच! आता काम नसल्याची बोंब करत सुटण्यापेक्षा आहे ते शारीरिक काम करण्याचीही आपली तयारी असली पाहिजे. अन्यथा या स्पर्धेच्या युगात स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिवरायांच्या रायगडातील मराठी माणसावरच येथून बाहेर जाण्याची वेळ येईल.

Sunday, March 2, 2008


आठवणी भटांच्या...
जगात मी आलो असा की,
मी जसा जगलोच नाही,
एकदा तुटलो असा की,
मग पुन्हा जुळलोच नाही.
संपल्यावर खेळ माझया आंधळया कोशिंबीरीचा,
लोक मज दिसले अचानक,
मी कधी दिसलोच नाही.
माझे येथे आता असे हे किती क्षण राहीले,
धुळीचे आता येथे कीती कण राहिले,
अजूनही कुणास्तव तेवतोय हा मंद प्राणांचा दिवा,
मला फसवायला अजून कुठले निमंत्रण बाकी राहीले.

प्रिये तुझे हे असे अवेळी लाजणे बरे नाही,
चेहरा गुलाबाने आज झाकणे बरे नाही,
मागचेच जुने ओठ दे माझे,
कुणाचे जूने देणे टाळणे बरे नाही.
- कविवर्य सुरेश भट

करवट बदलकर देख

दुनिया के साथ चलकर देख, रख अंदाज खुशीका न जलकर देख,तेरे लिए जमान दौडा आऐगा, तू भी अपना चेहरा बदलकर देख.हराम की दौलत हजम नही होती, चाहे चबाले उसे या निगलकर देख,धोखे, दगाबाजी मे सारी उम्र गवॉंदी, कुछ देर ही सही संभलकर देख.पत्थर को अगर लाना हो पसीना, मेहनत की तपीश मे तपकर देख,कामयाबी का सेहरा तेरे सर होगा, ऐ वक्‍त के वक्‍त घरसे निकलकर देख.

Monday, February 25, 2008


मनाच्या अंतरंगात कोकाटणाऱ्या शेकडो, हजारो, असंख्य प्रश्‍नांना आपल्याला उत्तर देता येतातच असं नसतं. मुळात काही प्रश्‍न ही फक्‍त प्रश्‍नच असतात. त्या प्रश्‍नांमध्येच उत्तर न मिळण्याचं गुढं लपलेल असत. म्हणुनच त्याची उत्तरं न शोधण चांगलं. पण, आपला मनुष्यस्वभाव जे मिळत नाही ते मिळविण्याचा, जे दिसत नाही ते पाहण्याचा, जे नाही ते भासवण्याचा... आणि मग नसलेलं भासवण्याच्या प्रयत्नात आपल्यासमोर असलेलं दिसेनासं व्हायला होतं. जे वास्तव आहे त्याचाही विसर पडतो. परंतु त्या वास्तवाचं असण नाकारता येणार नाही, जे नाही त्या मृगजळामागे धावण्यापेक्षा, जे आहे त्या वास्तवात अधिक काहीतरी शिकण्यासारखं, वाचण्यासारखं, अनुभवण्यासारखं असतं. जगातल ते वास्तव कुणाच ठावून कुठे गुडूप होऊन बसलयं ते ? पण माझं मला माहित आहे...मी.. मी... आणि फक्‍त मीच......